सोमवार, २२ जून, २०२०

कोरोना काळात झालेले दलितांवरील हल्ले

#संपत_चालेली_संवेदनशीलता!!
#तुमचा_मानवी_मेंदू?
#की_अमानवी मेंदू ?
#स्वतः_तपासून_घ्या.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आपल्या सवडीनुसार सांगणाऱ्या आणि त्यांच्याच विचारांना मूठमाती देणाऱ्या व्यक्तींचा आम्ही धिक्कार करतो.
________________________________

भारत हा एकमेव देश आहे जिथं प्राण्यांना वाचवण्यासाठी माणूस उभा राहतो पण माणसांच्या अमानुष हत्या केल्या जातात तेव्हा त्याच माणसांची तोंड जणू जातीच्या एका विशिष्ट धाग्याने शिवली जातात. एका बाजूला गाईला मारलं म्हणून आंदोलन करतात आणि दुसऱ्या बाजूला माणूस मारला जातो तेव्हा त्याची जात बघून निषेध नोंदवतात. तुम्हाला लाजा कश्या वाटत नाहीत ? 

भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथं स्वतंत्र, समता, बंधुता ही मूल्य सगळ्यांना लागू आहेत. पण तुम्ही स्वतःला भारतीय म्हणून न घेता स्वतःची ओळख जातीपूर्ती मर्यादित ठेऊन कोणता नवा देश उभारत आहात ? स्वतःच्या मानवी बुद्धीला जरा ज्ञानाच्या प्रकाशात तपासून घ्या. नक्की तुम्ही माणूसच आहात का ?

एका बाजूला शाळेत लहानपणापासून प्रतिज्ञा म्हणता "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत" मग दलित हे भारतीय नाहीत का ? त्यांना तुम्ही तुमचे बांधव मानत नाही का? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला आणि इथल्या प्रत्येक सजीवांना न्याय मिळेल तो असाच लिहिला. सगळ्यांना समान हक्क बहाल केले. चुकलं का त्यांचं ?

"भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे शाळा कॉलेजातील मुलांकडून म्हणवून घेतल्याने त्यांना भारत त्यांचा देश आणि सारे भारतीय त्यांचे बांधव वाटतील हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे . यासाठी संपूर्ण समाजात सामाजिक व आर्थिक न्याय निर्माण करावा लागेल . जोपर्यंत भारताच्या सीमेवर लढणाऱ्या अस्पृश्य समाजातील सैनिकांच्या आईवर , बहिणीवर किंवा पत्नीवर ती केवळ अस्पृश्य आहे म्हणून बलात्कार होतात . त्यांच्या नग्न मिरवणुकांची वर्णने वृत्तपत्रांत वाचायला मिळतात . दुष्काळात जोपर्यंत त्यांना गावच्या विहिरीवर पाणी भरू देत नाहीत , माणूस मेल्यानंतरही त्याला पुरण्यासाठी किंवा जाळण्यासाठी जागा मिळत नाही , तोपर्यंत त्या सैनिकाकडून राष्ट्रासाठी मरण्याची अपेक्षा करण्याचा आपल्याला कोणता नैतिक हक्क आहे ? त्याचे राष्ट्र कोणते ? त्याचे बांधव कोणते ? मित्र आणि शत्रू कोण ? तरीही हजारो अस्पृश्य सैनिक देशासाठी प्राणपणाने लढत आहेत . आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करीत आहेत . त्यांच्याप्रती साऱ्या देशाने कृतज्ञ राहिले पाहिजे . या अज्ञानी देशावरील त्यांचे ऋण कोण आणि कसे फेडणार ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, भारतीय संविधानाने एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य अशी राजकीय समता दिलेली आहे. पण सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे. तेच आज उघड डोळ्यांनी दिसत आहे. (डॉ.रावसाहेब कसबे, यांच्या डॉ.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, पान : १६१)

एका बाजूला शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला ब्राम्हणी विचारसरणी, जुलमी मनुचा कायदा जो कधीच आम्ही नेस्तनाबूत केला आहे तोच इकडे राबवायचा आणि स्वतःला पुरोगामी म्हणूम घ्यायचं. दलित वर्गाची मत मिळवण्यापूर्तच ह्यांच राजकारण आणि दलितांच्या हत्या केल्या जातात तेव्हा साधी निषेधार्थ ह्यांची एक प्रतिक्रिया नाही. दलित हत्या किती झाल्या आणि त्यापैकी किती लोकांना न्याय मिळाला? ह्याचा आकडा जर काढला तर तो न मोजता येईल इतका आहे.

मागे अ‍ॅट्रॉसिटी ला विरोध केला होता तो कशासाठी बिंधास्तपणे दलितांच्या कत्तली करत फिरता यावं ह्यासाठीचं का? खैरलांजी, जवखेडा, खर्डा किती किती उदाहरण द्यायची. आता आंदोलन करणं, मेणबत्त्या पेटवणं, मोर्चे काढणं आमच्यासाठी रोजचं झालं आहे. डोळ्यांचे अश्रू अजून ओले असतांनाच दुसरा घाव अंगावर पडतोय. ह्यांना दलित वर्ग संपवून नक्की काय साध्य करायचं आहे? ते एकदाच सांगून तरी टाकावं. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीवर अन्याय झाल्यावर दलित वर्गच सर्वांत आधी आवाज उठवतो. संवेदनशीलता म्हणतात त्याला ती संवेदनशीलता इतर वर्गात मला तरी आजिबात दिसत नाही.

आम्ही कलावंत जातीविरहित समाज निर्माण करण्याच्या मार्गावर चालत असतांना, बुद्धांच्या प्रेम आणि करुणेने सर्वांना आपलंसं करू पाहतो त्यातचं जातीवरून कत्तली करण्याचा बाजार उठेला बघून असह्य होतं. बुद्धांनी, बाबासाहेबांनी अनेक महापुरुषांनी रक्ताचा एक थेंब ही न सांडता क्रांती करून दाखवली आपण त्यांचेच अनुयायी आहोत हे सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. काठीला-काठी, शिवीला-शिवी, तलवारीला- तलवार लावण्याची भाषा कारणाऱ्यातील आपण नाहीत हे लक्षात असू द्या. 

आपण जर असे कृत्य केले तर इथली संविधानिक न्याय व्यवस्था किती पोकळ आहे हे त्याचं म्हणणं ते समोर आणतील. मुळात न्यायव्यवस्था पोकळ नाही तर ती हतबल आहे.त्यांना ही तेच हवं आहे. ब्राह्मणी विचारसरणीशी लढण्यासाठी आपल्याला संविधानिक मार्गच अवलंबवावा लागेल.
अरविंद बनसोड ह्यांची हत्या आणि नुकतीच प्रेम प्रकरणातून झालेली विराज जगताप ह्याची हत्या तळपायाची आग मस्तकात नेतात. चित्रपट जगतात प्रेम करणारे जात पाहून प्रेम करत नाहीत त्यांना कोणी जात विचारत नाहीत. त्यांच्या कत्तली होतं नाहीत. परंतु गोचिडा सारखं माणसाच्या मेंदूत चिकटून बसलेली जात इथल्या समाजातील लोकांच्या मेंदूतून का जात नाही? प्रेम करणं हि जात पाहून करण्याची गोष्ट असेल तर ह्या जातिवाद्यांनी कपाळावर खुशाल जातीच्या नावाचं गोंदण गोंदवून घ्यावं. 'ऑनर किलिंग' प्रकार जरा जास्तच घडत चालला आहे पण ऑनर तरी कसला ? जातीचा ? मुळात ऑनर किलिंग ही संकल्पनाच चुकीची आहे. त्याऐवजी Caste Violence असा शब्दप्रयोग का करीत नाहीत?
हि जात नावाची वाळवी संपवण्यासाठी सगळ्यांनी आधी आपल्या अमानवी मेंदूच मानवी मेंदूत रूपांतर करून घ्यावं.

अन्याय झाल्यावर आपण सत्याच्या बाजूने भूमिका घेतो आणि तिचं भूमिका असावी. न्याय हवा असेल तर भावनिक न होता, हिंसक न बनता आपला विवेक शाबूत ठेऊन, योग्य पाठपुरावा करून, मुद्देसुतपणाने कायदेशीर मार्ग अवलंबवावा. काही व्यक्तींना ही मत पटणार नाहीत कारण त्यांच्या मते न्याय व्यवस्था पोकळ ठरत चालली हे. परंतु ती न्याय व्यवस्था पोकळ नाही तर हतबल आहे.

कारण न्यायव्यवस्थेसमोर पुरावे विरोधातील तयार होतात. साक्षीदारांवर प्रचंड दबाव आणला जातो आणि जात दांडगे, धनदांडगे कोर्टात पुरावे पोहोचू देत नाहीत. आमिष, दहशत इत्यादी माध्यमातून साक्षीदार विरोधी केले जातात. रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या नितीन आगेला शाळेतून ओढून नेऊन मारला. रयतेचे सर्व शिक्षक, स्टाफ विरोधी झाले. कर्मवीरांच्या संस्थेत सत्याचा झालेला हा पराभव आहे!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते "शासनकर्ती जमात बना" त्यासाठी आपल्याला आप आपसातील राजकिय आणि सामाजिक मतभेद सोडून एक होणं गरजेचं आहे. कारण डोक्यातून जात गेल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत मग कितीही "राष्ट्रवादा" ची लेबलं लावा.

आंतरजातीय विवाह कायदा आहे. त्यामूळे कोणीही कोणत्याही जातीच्या व्यक्तीसोबत प्रेम करू शकतो. लग्न करू शकतो. सगळ्यात जास्त आंतरजातीय विवाह हे महाराष्ट्रात झालेत. खुद्द शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा विवाह आंतरजातीय केला होता. बाबासाहेबांनी शारदा कबीर ह्यांच्याशी विवाह केला होता. महात्मा फुले ह्यांचे दत्तक पुत्र यशवंत ह्यांचा विवाह आंतरजातीय होता. मग इथं ऑनर किलिंग हा प्रकार घडणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. 

सोशल मीडिया वर मागे हत्तींनीच्या मृत्यूवर सगळ्यांनी दुःख व्यक्त केले. अमेरिकेतील वंशवादातून झालेल्या जॉर्ज च्या हत्येचा निषेध व्यक्त केला. मग दलितांच्या हत्या होतात तेव्हा निषेध का व्यक्त केला जात नाही? तेव्हा माणसातील संवेदनशीलता कुठं मरून पडते? माणुसकी संपत चालली आहे हेच जास्त ऐकायला मिळते पण तसं नाहीये माणुसकी सुद्धा जातीच्या जाळ्यात अडकली आहे हेच सत्य आहे.

येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहोत? कुचक्या जातीच्या अभिमानापायी आम्ही माणसं कापली हेच ? येणाऱ्या काळात प्रेम विवाह जास्त होतील ह्याची खात्री आहे. परंतू धर्माच्या ठेकेदारांनी जे माणसांवर संस्कार केलेत तेच संस्कार आपल्या मुलांवर न करता त्यांना चांगला माणूस बनवा. बदल हा लगेच घडून येत नसतो. बदल ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे वेळ लागेल. बुद्ध सर्वांना स्विकारावाचं लागेल. किंबहुना बुद्ध जगावा लागेल.
न्यायासाठी योग्य राजकीय आधार हि हवा. म्ह्णून राजकिय संघटन ही मजबूत करणं आवश्यक आहे.
त्यासाठी आत्ताच आपसांतील मतभेद विसरून एक होणं गरजेचं आहे. उजवी विचारसरणी असलेली सत्तेत आहेत ज्यांची पोटं भरली आहेत आणि पोटा खालच्या भागाची भूक ही भरली आहे. त्यांनीच सोडलेली बांडगुळ आपल्याशी भिडत आहेत. ह्यांना आपण वैचारिक मार्गातून उत्तर देणं आवश्यक आहे ना की हिंसक बनून. उच्च पदाच्या जागा काबीज करा. हिंसक भूमिका घेऊन चाललो तर फक्त तुरुंग भेटतो मान्य आपण तुरुंगाला घाबरत नाही पण आपल्या पिढ्यांच्या पिढया त्यामुळे बरबाद होतं आहेत.

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं।।

शब्दच आपले शस्त्र आहेत म्हणून न्यायासाठी आपण संविधानिक मार्गच अवलंबवू. त्यासाठी सदैव आपला मानवी मेंदू शाबूत ठेऊ. आपला विवेक जपू. जे जातीवाद करत आहेत त्यांनी त्यांचा मेंदू 'मानवी' की 'अमानवी' हे तपासून घ्यावे.
तुमच्या सारखीच आम्ही हाडा मासाची माणसं आहोत. जो अधिकार तुम्हाला आहे तोच अधिकार सर्वांना आहे. 

तथाकथित वरच्या जातीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी कोवळ्या जीवांची रानटी पद्धतीने हत्या करणं ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आपल्या सवडीनुसार सांगणाऱ्या आणि त्यांच्याच विचारांना मूठमाती देणाऱ्या व्यक्तींचा आम्ही धिक्कार करतो.

#JusticeForArvindBansode
#JusticeForVirajJagtap

#जय_भारत
#जय_संविधान

✍️रोहित_जगताप
©️8788450251

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा