शनिवार, २७ जून, २०२०

Rohit Jagtap: माझी ती !!!

Rohit Jagtap: माझी ती !!!: दाटलेले शब्द हृदयातील तुझ्या ते सर्वांच्या कानी पडू दे शृंगार सोडून, भेदाभेद मोडून तू मुक्त पाखरू आकाश कवेत घेणारी तुझ्या विद्रोहाची प्रकाश ...

बुधवार, २४ जून, २०२०

संविधान

पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही,
स्वातंत्र्याची ही गं दशा आता काही बघवत नाही,
हिंमत नाही . !!ध!!

माफ कर बाळा मला नाही जमलं हे गं काम,
संविधान देशाचं ग जाळलंय नाही बघवलं,
'देश हा महान आमचा कसं सांगू कुणा ?'
स्वातंत्र्य ते काय असतं विचार कुन्या भक्तांला,
लोकांच्या दरबारी इथं लोकशाहीस किंमत नाही, !!१!!

सोन्या मोन्या (दोन्ही लेकरं) माफी द्यावी तुम्हा लय शिकाया लावलं,
पण त्या घटनेनं रक्त सारं  गिळून घेतलं,
नाही आम्हाला आराम नाही पोटा चारा,
दिस रात्र कष्ट आमुचं,
त्योच देशाला पहारा,
द्वेषा पाई भडकून, संविधान ते जाळून,
नारा मुर्दाबाद चा ग, गाजला त्या दिल्लीतं..
पण जनतेला गं इथल्या त्याच काही घेण नाही..!!२!!

जातीपाती ची ती तेढं लागली आता गं वाढू,
समतेचा तो ग वसा, लागलाय आता ढासाळू.
जणावरां इथं पुरे रक्षण मिळत हाई,
माणुस मातरं रोज मरतोय त्याची कुणा काही नाही,
धर्मनिरपेक्ष राष्ट्र चांगलं तेचं बाई,
कुठून पुन्हा मनु उठलाय
काही कळनां गं बाई.
शिकून मोठी हो गं बाऴा देशाला तू वाचवं,
द्वेषाच्या ह्या रस्त्यावर समतेची वाट बनवं.
आम्ही नाही केलं काही
पोरी तू तरी करं काही..!! ३ !!

देशद्रोही व्यक्ती त्या गं ज्यांन जाळलं ते पानं,
मिडीया ही त्यांचा च गं नाही घेतली दखलं,
जुल्माच्या ह्या बाजारात अन्याय होतं हाई
सरकार मातरं गप्पगार, विकासाच्या बाता हाई
वाचवाया लोकशाही
वाचवाया संविधान
शिक्षणाचा घेऊन ध्यास
लढ बाई देशासाठी.....

रोहित जगताप
२७ आँगस्ट २०१८
८९८३४५१५००

(टीप:- मूळ रचना अरविंद जगताप ह्यांची आहे. मी फक्त त्यांच्या लिखाणाचा लिबाज वापरून ही कविता लिहिली आहे.)

वाढदिवसाच्या विद्रोही शुभेच्छा

तुला काहीच येत नाही लहान आहेस गं,
असं म्हणणाऱ्यांना तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव,
दु:खाला सामोर कसं जायचं हे तू त्यांना शिकवं,
स्मित हास्याने तुझ्या लाखो विरोधकांना जागीच मुकव,
अंधाऱ्या या जगात प्रेमाची अणं समतेची ज्योत तू पेटव,
मान्य आहे तू आहेस माझ्या विचारांची 
ज मताची गुलाम नाहीस स्मरणात ठेव
विद्रोह कर त्या समाजाशी ज्यात माणसाला किंमत नाही,
तिथं सर्वांना तू जिजाई,सावित्री रमाई होऊन दाखवं,
भरून काढ गरिबांच्या घरातल्या वेदना साऱ्या,
इथं समाजासाठी तू काही तरी करून दाखवं,
स्वत:साठी जगतात गं सारे,
तू जरा शोषितांनसाठी जगुन बघं,
जातीपातीच्या ह्या बंधनात तू भिमाची वाघिणं होऊन बघं
वाढदिवसाच्या दिनी आरोळी अशी तू दे,
एक करू तुटलेल्या मनांना अशी शपत तू मला दे.
 
रोहित जगताप
८९८३४५१५००

माझी ती !!!

दाटलेले शब्द हृदयातील तुझ्या
ते सर्वांच्या कानी पडू दे
शृंगार सोडून, भेदाभेद मोडून
तू मुक्त पाखरू आकाश कवेत घेणारी
तुझ्या विद्रोहाची प्रकाश किरणे
जगास डोळे भरून पाहू दे
जातीच्या चौकटी सोडून
धर्मग्रंथातील विषम लेद तोडून
लाथाडून साऱ्या कर्मकांडाला
तू स्विकारलीस बुद्धाची छाया
कित्येक कोमेजल्या पाखरांना
तू लावलीस सखे माया
भाळावरी तुझ्या पतीव्रतेच
तू नकोस मिरवू गोंदण
तुझ्या चेहऱ्यावर सदा राहो ऊर्जेच चांदण
झुगारून देऊन ही कचऱ्याची जिंदगी
तू नाही मिरवणार मंगळसूत्र नावाचा
गुलामी कासरा
कैक स्त्रियांना तुला द्यायचा आहे
आता आसरा
तसा लावतेस तू, देतेस धक्का पुरुषी सत्तेला
कौटुंबिक कलहाला,अन सामाजिक उतरंडीला
तुझ्या शब्दांनी तू गाढुन टाकली आहेस
इथली स्त्रीला कमी लेखणारी जमात
आणि मज ठाऊक आहे
तू एक प्रखर ज्वालामुखी होऊन
करणार आहेस सर्वांवर मात
सगळ्यांच्याचं जगण्याला चिकटली आहेत
इथं संस्काराची पूरातन ठिगळं,
मासिकपाळीला हिणं लेखणारी
वाढली आहेत बांडगुळं,
भावना-इच्छा-वासना ह्यांचा इतका वाढलाय जोर
Kiss-sex म्हणजे काय गं? आज विचारतयं तान्ह पोरं
लिंगपिसाट कुत्री हल्ली गल्लोगल्लीत दिसतायत
तान्ही म्हणू नये म्हातारी म्हणून नये
नुसतेच बलात्कार करत सूटतायतं
पण तू वेळोवेळी बनली आहेस जिजाई,
सावित्रीबाई, रमाई,अहिल्याबाई अनं झाशीची राणी सुद्धा,पण इथल्या पुरुष प्रधान सत्तेला
शिवबा, शाहू,जोती,आंबेडकर,
भगत सिंग, होता आले नाही
तू पेटवलीस विद्रोहाची ठिणगी
अणं तू दिल्यात कैक क्रांतिकारी घोषणा
मला आता समजलाय तुझा समतेचा सिद्धांत
उमगलाय संघर्षाचा शब्दार्थ
जाणवलायं विद्रोहाचा भावार्थ
मी पाहतोय तुझी गगन भरारी
मी ऐकतोय तुझं मुक्तीच गाणं
मी पाहतोय तुला सूर्याला पोखरतांना
तुझ्या समतेच्या प्रखर तेजाने
एक नवा सूर्य तयार होईल
जो देईल प्रकाश इथल्या समस्थ स्त्रियांना
आणि करून देईल जाणीव
त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची.
रोहित जगताप
८९८३४५१५००
बदलापूर

विद्रोह

विद्रोह गोंदुन घेतलाय कधीच भाळावर।
भिडत असतो आम्ही लेखणीच्या जोरावर।।

इथला भिक्कार कवी वर्ग लिहितो फक्त प्रेम गीत।
कधी त्याने लिहिलेच नाही सर्वसामान्य जनतेच गाणं।।

शालीनतेचा पदर पांघरून नाचतात नटनट्या मंचावर।
अर्ध नग्न शरीराचा नंगानाच आणि त्याला बक्षिसे! आरं थु।।

आमच्या आया बहिणींना नागवं केलं जात तेव्हा हे कवी
बसतात पेनाच टोक ढुंगणावर खाजवत
पण आम्ही लिहितो,गातो,मांडतो व्यथा इथल्या अव्यस्थेच्या
आणि आम्हाला भेटतो तुरुंग आणि देशद्रोही नावाचं बक्षीस

त्यांची लेखणी लिहिते देवाने सूर्य गिळला म्हणून। 
आम्ही लिहितो आम्हाला प्रकाश मिळावा म्हणून।।

पण अर्वाच्य भाषा आणि शिवराळ उत्तरें !
ही विद्रोहाची कधीच बनणार नाही व्याख्या।
विद्रोह आणि विवेक बहिणी असतात सख्या ।।

कुणालाही असं इथं गगनभरारी घेता येत नाही
कारण प्रत्येकालाच इथं नामदेव
ढसाळ होता येत नाही।।

डोक्यात ठेवतो आम्ही विद्रोही तुकाराम।
फेकून दिलाय डोक्यातून काढून कधी तुमचा स्वार्थी राम।।

शांतीचादूत माझा बुद्ध एकदा जगून बघ।
चांगला सम्यक विचार एकदा करून तर बघ.

#रोहित_जगताप
८९८३४५१५००

सोमवार, २२ जून, २०२०

कोरोना काळात झालेले दलितांवरील हल्ले

#संपत_चालेली_संवेदनशीलता!!
#तुमचा_मानवी_मेंदू?
#की_अमानवी मेंदू ?
#स्वतः_तपासून_घ्या.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आपल्या सवडीनुसार सांगणाऱ्या आणि त्यांच्याच विचारांना मूठमाती देणाऱ्या व्यक्तींचा आम्ही धिक्कार करतो.
________________________________

भारत हा एकमेव देश आहे जिथं प्राण्यांना वाचवण्यासाठी माणूस उभा राहतो पण माणसांच्या अमानुष हत्या केल्या जातात तेव्हा त्याच माणसांची तोंड जणू जातीच्या एका विशिष्ट धाग्याने शिवली जातात. एका बाजूला गाईला मारलं म्हणून आंदोलन करतात आणि दुसऱ्या बाजूला माणूस मारला जातो तेव्हा त्याची जात बघून निषेध नोंदवतात. तुम्हाला लाजा कश्या वाटत नाहीत ? 

भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथं स्वतंत्र, समता, बंधुता ही मूल्य सगळ्यांना लागू आहेत. पण तुम्ही स्वतःला भारतीय म्हणून न घेता स्वतःची ओळख जातीपूर्ती मर्यादित ठेऊन कोणता नवा देश उभारत आहात ? स्वतःच्या मानवी बुद्धीला जरा ज्ञानाच्या प्रकाशात तपासून घ्या. नक्की तुम्ही माणूसच आहात का ?

एका बाजूला शाळेत लहानपणापासून प्रतिज्ञा म्हणता "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत" मग दलित हे भारतीय नाहीत का ? त्यांना तुम्ही तुमचे बांधव मानत नाही का? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला आणि इथल्या प्रत्येक सजीवांना न्याय मिळेल तो असाच लिहिला. सगळ्यांना समान हक्क बहाल केले. चुकलं का त्यांचं ?

"भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे शाळा कॉलेजातील मुलांकडून म्हणवून घेतल्याने त्यांना भारत त्यांचा देश आणि सारे भारतीय त्यांचे बांधव वाटतील हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे . यासाठी संपूर्ण समाजात सामाजिक व आर्थिक न्याय निर्माण करावा लागेल . जोपर्यंत भारताच्या सीमेवर लढणाऱ्या अस्पृश्य समाजातील सैनिकांच्या आईवर , बहिणीवर किंवा पत्नीवर ती केवळ अस्पृश्य आहे म्हणून बलात्कार होतात . त्यांच्या नग्न मिरवणुकांची वर्णने वृत्तपत्रांत वाचायला मिळतात . दुष्काळात जोपर्यंत त्यांना गावच्या विहिरीवर पाणी भरू देत नाहीत , माणूस मेल्यानंतरही त्याला पुरण्यासाठी किंवा जाळण्यासाठी जागा मिळत नाही , तोपर्यंत त्या सैनिकाकडून राष्ट्रासाठी मरण्याची अपेक्षा करण्याचा आपल्याला कोणता नैतिक हक्क आहे ? त्याचे राष्ट्र कोणते ? त्याचे बांधव कोणते ? मित्र आणि शत्रू कोण ? तरीही हजारो अस्पृश्य सैनिक देशासाठी प्राणपणाने लढत आहेत . आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करीत आहेत . त्यांच्याप्रती साऱ्या देशाने कृतज्ञ राहिले पाहिजे . या अज्ञानी देशावरील त्यांचे ऋण कोण आणि कसे फेडणार ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, भारतीय संविधानाने एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य अशी राजकीय समता दिलेली आहे. पण सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे. तेच आज उघड डोळ्यांनी दिसत आहे. (डॉ.रावसाहेब कसबे, यांच्या डॉ.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, पान : १६१)

एका बाजूला शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला ब्राम्हणी विचारसरणी, जुलमी मनुचा कायदा जो कधीच आम्ही नेस्तनाबूत केला आहे तोच इकडे राबवायचा आणि स्वतःला पुरोगामी म्हणूम घ्यायचं. दलित वर्गाची मत मिळवण्यापूर्तच ह्यांच राजकारण आणि दलितांच्या हत्या केल्या जातात तेव्हा साधी निषेधार्थ ह्यांची एक प्रतिक्रिया नाही. दलित हत्या किती झाल्या आणि त्यापैकी किती लोकांना न्याय मिळाला? ह्याचा आकडा जर काढला तर तो न मोजता येईल इतका आहे.

मागे अ‍ॅट्रॉसिटी ला विरोध केला होता तो कशासाठी बिंधास्तपणे दलितांच्या कत्तली करत फिरता यावं ह्यासाठीचं का? खैरलांजी, जवखेडा, खर्डा किती किती उदाहरण द्यायची. आता आंदोलन करणं, मेणबत्त्या पेटवणं, मोर्चे काढणं आमच्यासाठी रोजचं झालं आहे. डोळ्यांचे अश्रू अजून ओले असतांनाच दुसरा घाव अंगावर पडतोय. ह्यांना दलित वर्ग संपवून नक्की काय साध्य करायचं आहे? ते एकदाच सांगून तरी टाकावं. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीवर अन्याय झाल्यावर दलित वर्गच सर्वांत आधी आवाज उठवतो. संवेदनशीलता म्हणतात त्याला ती संवेदनशीलता इतर वर्गात मला तरी आजिबात दिसत नाही.

आम्ही कलावंत जातीविरहित समाज निर्माण करण्याच्या मार्गावर चालत असतांना, बुद्धांच्या प्रेम आणि करुणेने सर्वांना आपलंसं करू पाहतो त्यातचं जातीवरून कत्तली करण्याचा बाजार उठेला बघून असह्य होतं. बुद्धांनी, बाबासाहेबांनी अनेक महापुरुषांनी रक्ताचा एक थेंब ही न सांडता क्रांती करून दाखवली आपण त्यांचेच अनुयायी आहोत हे सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. काठीला-काठी, शिवीला-शिवी, तलवारीला- तलवार लावण्याची भाषा कारणाऱ्यातील आपण नाहीत हे लक्षात असू द्या. 

आपण जर असे कृत्य केले तर इथली संविधानिक न्याय व्यवस्था किती पोकळ आहे हे त्याचं म्हणणं ते समोर आणतील. मुळात न्यायव्यवस्था पोकळ नाही तर ती हतबल आहे.त्यांना ही तेच हवं आहे. ब्राह्मणी विचारसरणीशी लढण्यासाठी आपल्याला संविधानिक मार्गच अवलंबवावा लागेल.
अरविंद बनसोड ह्यांची हत्या आणि नुकतीच प्रेम प्रकरणातून झालेली विराज जगताप ह्याची हत्या तळपायाची आग मस्तकात नेतात. चित्रपट जगतात प्रेम करणारे जात पाहून प्रेम करत नाहीत त्यांना कोणी जात विचारत नाहीत. त्यांच्या कत्तली होतं नाहीत. परंतु गोचिडा सारखं माणसाच्या मेंदूत चिकटून बसलेली जात इथल्या समाजातील लोकांच्या मेंदूतून का जात नाही? प्रेम करणं हि जात पाहून करण्याची गोष्ट असेल तर ह्या जातिवाद्यांनी कपाळावर खुशाल जातीच्या नावाचं गोंदण गोंदवून घ्यावं. 'ऑनर किलिंग' प्रकार जरा जास्तच घडत चालला आहे पण ऑनर तरी कसला ? जातीचा ? मुळात ऑनर किलिंग ही संकल्पनाच चुकीची आहे. त्याऐवजी Caste Violence असा शब्दप्रयोग का करीत नाहीत?
हि जात नावाची वाळवी संपवण्यासाठी सगळ्यांनी आधी आपल्या अमानवी मेंदूच मानवी मेंदूत रूपांतर करून घ्यावं.

अन्याय झाल्यावर आपण सत्याच्या बाजूने भूमिका घेतो आणि तिचं भूमिका असावी. न्याय हवा असेल तर भावनिक न होता, हिंसक न बनता आपला विवेक शाबूत ठेऊन, योग्य पाठपुरावा करून, मुद्देसुतपणाने कायदेशीर मार्ग अवलंबवावा. काही व्यक्तींना ही मत पटणार नाहीत कारण त्यांच्या मते न्याय व्यवस्था पोकळ ठरत चालली हे. परंतु ती न्याय व्यवस्था पोकळ नाही तर हतबल आहे.

कारण न्यायव्यवस्थेसमोर पुरावे विरोधातील तयार होतात. साक्षीदारांवर प्रचंड दबाव आणला जातो आणि जात दांडगे, धनदांडगे कोर्टात पुरावे पोहोचू देत नाहीत. आमिष, दहशत इत्यादी माध्यमातून साक्षीदार विरोधी केले जातात. रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या नितीन आगेला शाळेतून ओढून नेऊन मारला. रयतेचे सर्व शिक्षक, स्टाफ विरोधी झाले. कर्मवीरांच्या संस्थेत सत्याचा झालेला हा पराभव आहे!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते "शासनकर्ती जमात बना" त्यासाठी आपल्याला आप आपसातील राजकिय आणि सामाजिक मतभेद सोडून एक होणं गरजेचं आहे. कारण डोक्यातून जात गेल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत मग कितीही "राष्ट्रवादा" ची लेबलं लावा.

आंतरजातीय विवाह कायदा आहे. त्यामूळे कोणीही कोणत्याही जातीच्या व्यक्तीसोबत प्रेम करू शकतो. लग्न करू शकतो. सगळ्यात जास्त आंतरजातीय विवाह हे महाराष्ट्रात झालेत. खुद्द शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा विवाह आंतरजातीय केला होता. बाबासाहेबांनी शारदा कबीर ह्यांच्याशी विवाह केला होता. महात्मा फुले ह्यांचे दत्तक पुत्र यशवंत ह्यांचा विवाह आंतरजातीय होता. मग इथं ऑनर किलिंग हा प्रकार घडणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. 

सोशल मीडिया वर मागे हत्तींनीच्या मृत्यूवर सगळ्यांनी दुःख व्यक्त केले. अमेरिकेतील वंशवादातून झालेल्या जॉर्ज च्या हत्येचा निषेध व्यक्त केला. मग दलितांच्या हत्या होतात तेव्हा निषेध का व्यक्त केला जात नाही? तेव्हा माणसातील संवेदनशीलता कुठं मरून पडते? माणुसकी संपत चालली आहे हेच जास्त ऐकायला मिळते पण तसं नाहीये माणुसकी सुद्धा जातीच्या जाळ्यात अडकली आहे हेच सत्य आहे.

येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहोत? कुचक्या जातीच्या अभिमानापायी आम्ही माणसं कापली हेच ? येणाऱ्या काळात प्रेम विवाह जास्त होतील ह्याची खात्री आहे. परंतू धर्माच्या ठेकेदारांनी जे माणसांवर संस्कार केलेत तेच संस्कार आपल्या मुलांवर न करता त्यांना चांगला माणूस बनवा. बदल हा लगेच घडून येत नसतो. बदल ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे वेळ लागेल. बुद्ध सर्वांना स्विकारावाचं लागेल. किंबहुना बुद्ध जगावा लागेल.
न्यायासाठी योग्य राजकीय आधार हि हवा. म्ह्णून राजकिय संघटन ही मजबूत करणं आवश्यक आहे.
त्यासाठी आत्ताच आपसांतील मतभेद विसरून एक होणं गरजेचं आहे. उजवी विचारसरणी असलेली सत्तेत आहेत ज्यांची पोटं भरली आहेत आणि पोटा खालच्या भागाची भूक ही भरली आहे. त्यांनीच सोडलेली बांडगुळ आपल्याशी भिडत आहेत. ह्यांना आपण वैचारिक मार्गातून उत्तर देणं आवश्यक आहे ना की हिंसक बनून. उच्च पदाच्या जागा काबीज करा. हिंसक भूमिका घेऊन चाललो तर फक्त तुरुंग भेटतो मान्य आपण तुरुंगाला घाबरत नाही पण आपल्या पिढ्यांच्या पिढया त्यामुळे बरबाद होतं आहेत.

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं।।

शब्दच आपले शस्त्र आहेत म्हणून न्यायासाठी आपण संविधानिक मार्गच अवलंबवू. त्यासाठी सदैव आपला मानवी मेंदू शाबूत ठेऊ. आपला विवेक जपू. जे जातीवाद करत आहेत त्यांनी त्यांचा मेंदू 'मानवी' की 'अमानवी' हे तपासून घ्यावे.
तुमच्या सारखीच आम्ही हाडा मासाची माणसं आहोत. जो अधिकार तुम्हाला आहे तोच अधिकार सर्वांना आहे. 

तथाकथित वरच्या जातीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी कोवळ्या जीवांची रानटी पद्धतीने हत्या करणं ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आपल्या सवडीनुसार सांगणाऱ्या आणि त्यांच्याच विचारांना मूठमाती देणाऱ्या व्यक्तींचा आम्ही धिक्कार करतो.

#JusticeForArvindBansode
#JusticeForVirajJagtap

#जय_भारत
#जय_संविधान

✍️रोहित_जगताप
©️8788450251

प्रिये मराठी प्रेम कविता

#'प्रिये!'

तू लक्झरी फ्लॅट मधली राणी प्रिये,
मी गल्लीबोळातला फकीर गं।
तू शोरूम मधली BMW प्रिये,
मी शोरूम बाहेरचं गॅरेज गं।

तू बिस्लेरीच मिनरल वॉटर प्रिये,
मी पालिकेच्या नळाचं अशुद्ध पाणी गं
तू श्रीमंतांच्या घरातील वॉल पेंटिंग प्रिये,
मी गरिबांच्या झोपडीतलं रोजच लोड शेडिंग गं

तू फुललेला मोराचा पिसारा प्रिये,
मी घर भर पांगलेला पसारा गं
तू गोव्याचा सुंदर किनारा प्रिये,
मी तुडुंब भरलेल्या नाल्यातला गाळ गं

तू महागड सुगंधी अत्तर प्रिये,
मी शेतकऱ्याच्या घामाचा वास गं
तू मॉल मधले शो चं झाड प्रिये,
मी वावरातला बाबुळी काटा गं

तू मोदीजींच मोठं मोठं आश्वासन प्रिये,
मी मतदार या भारताचा आशावादी नागरिक गं
तू खोट्या पुरोगामी नेत्यांच भाषण प्रिये,
मी क्रांतिकारकांच्या विचारांचा पाईक गं

तू वटपौर्णिमेच एक थोथांड प्रिये,
मी सत्य सांगणाऱ्या फुलेंचा अनुयायी गं
तू कर्मकांड-अंधश्रद्धा प्रिये,
मी दाभोळकरांचा सच्चा सैनिक गं

तू माणसाला गुलाम बनवणारी ब्राह्मणशाही प्रिये,
मी अठरा पगड जातीची शिवशाही गं
तू सत्ताधाऱ्यांतील गोडसेवादी प्रिये,
मी संघर्ष करणारा आंबेडकरवादी गं

तू 'धर्मांध' कट्टरतेच संघत्व प्रिये,
मी अखंड मानवतेच्या समतेच बुद्धत्व गं
तू 'जात' नावाचं काटेरी झाड प्रिये,
मी जातीचं झाडं तोडणारा लाकूड तोड्या गं

तू बाटलेली शेतातली विहीर प्रिये,
मी महाडच्या तळ्याचं चवदार पाणी गं
तू माणसं कापणारी जमात प्रिये,
मी माणसं जोडणारी औलाद गं

तू नियती पुढं हरवत चालली तुझी वाट प्रिये,
मी बोधिसत्वाच्या प्रकाशात वर चढलेला घाट गं
तू नष्ट होत चाललेली मनूची कहाणी प्रिये
मी विद्रोही कंठातून गातोय क्रांती गाणी गं

तुझा काटेरी गुलदस्ता ग
माझा समतेचा रस्ता गं
तू मेट्रोमोनिवर जातीचा मुलगा शोधणारी प्रिये,
मी फक्त सजीवांवर प्रेम करणारा आस्तिक ग गं

✍️रोहित जगताप
©️8788450251